weather update:राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता.
आता राज्यातील सर्वच भागांमधील पावसाने विश्रांती घेतली असल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
Weather Update पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेचे असणार आहेत. 1 मे रोजी जेऊर येथे राज्यातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर बारामती येथील किमान तापमान 21.6 अंश म्हणजेच सर्वात कमी राहिलं.
आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहील. 1 मे रोजी मुंबईत 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 2 मे रोजी कमाल तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1 मे रोजी पुण्यात किमान 25 तर कमाल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 2 मे रोजी पुण्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच राहणार असून किमान तापमानात मात्र 3 अंशांनी घट होणार आहे.
Weather Update पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ झाली असून कोल्हापूरकरांनाही उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. पुढील दोन दिवसांत कोल्हापूरच्या तापमानत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी पारा 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे
नागपुरात 1 मे रोजी किमान 23 तर कमाल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 2 मेलाही तापमानाची हीच स्थिती राहणार असून कमाल तापमानात एका अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेबाबत प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांवर या काळात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांना निर्जलीकरणाचा धोका असू शकतो. पालकांनी आपल्या मुलांनी दररोज किमान 10 ग्लास पाणी पिण्याची खात्री करावी. डॉक्टरांनी द्रवपदार्थाचे सेवन, ओरल रिहायड्रेशन आणि दुपारी बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.