Shares Of Vodafone Idea
कर्जबाजारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये अलीकडेच मोठी वाढ झाली आहे. सरकारचा व्होडाफोन आयडियामध्ये 33 टक्के सर्वात मोठा हिस्सा आहे. पण सरकार सध्यातरी कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी करण्याच्या मनस्थितीत नाही. 27 फेब्रुवारीला निधी उभारण्याची कंपनीची योजना असून याचा वापर 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल.
वेळ आल्यावरच याबाबत निर्णय
कुमार मंगलम बिर्ला यांचा आदित्य बिर्ला ग्रुप आणि ब्रिटीश कंपनी व्होडाफोन पीएलसी हे व्होडाफोन आयडियाचे प्रवर्तक आहेत. मात्र यामध्ये सर्वात मोठा वाटा सरकारचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडियामधील आपला हिस्सा विकण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. वेळ आल्यावरच कोणताही निर्णय घेतला जाईल.
2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचा असा विश्वास आहे की कंपनीने प्रथम एक विश्वासार्ह पुनरुज्जीवन योजना आणली पाहिजे व त्यानंतरच सरकार कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकते. कंपनीवर 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून तिचा तोटा सातत्याने वाढत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सरकारने थकबाकीच्या मोबदल्यात कंपनीतील भागभांडवल घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 फेब्रुवारीला शेअरची किंमत 6.85 रुपये होती. आता शुक्रवारी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भाव हा 17 रुपयांवर पोहोचला आहे.
सरकारकडून इतक्या रकमेला खरेदी
सरकारने त्यात आपला हिस्सा विकल्यास चांगला परतावा मिळू शकतो. वर्षभरापूर्वी सरकारने व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 10 रुपयांना विकत घेऊन मोठी जोखीम पत्करली होती. त्यावेळी त्याची बाजारभाव 6.85 रुपये होती. पण कंपनी कायद्यानुसार, शेअर्स त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी किंमतीला खरेदी करता येत नाहीत.
निधी उभारण्याची योजना
व्होडाफोन आयडियाने 22 फेब्रुवारी रोजी म्हणजेच गुरुवारी निधी उभारण्याची योजना जाहीर केली होती. कंपनीला अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज असून या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओनंतर व्होडाफोन आयडिया ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र काही काळापासून आयडियाच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे.
ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.