नवनवीन प्रयोगातून साधली प्रगती
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खंदारबन येथील शेतकरी गंगाधर साधू हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यामुळे श्री. साधू यांनी काळाची गरज ओळखून त्यांच्या पाच ते सहा एकर शेतीवर मनरेगा अंतर्गत फळपीक लागवड या योजनेतून करवंदाची लागवड केली आहे. याच करवंदाच्या फळापासून पानावर लावलेली गुलाबी चेरी तयार होते. या पिकाला मागणी आणि दर चांगला आहे. या पिकाला फारसे पाणी लागत नाही. फारशी फवारणी व खताचा सुद्धा खर्च नाही. याचे एकरी पाच ते सहा टन उत्पन्न मिळते. यापासून दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न श्री. साधू यांना मिळते.
या करवंदाची लागवड एका रांगेत चार फुटाच्या अंतरावर व दोन ओळीतील अंतर २० फूट याप्रमाणे ५०० रोपांची लागवड केली आहे. या करवंदाच्या झाडाला तीन वर्षांपासून फळे लागण्यास सुरुवात होते व उत्पन्न सुरू होते. तीन वर्षांपासून ते पुढील ३० वर्षांपर्यंत हमखास उत्पन्न मिळते. याची तोडणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होते.
या करवंदासाठी जळगाव, मुक्ताईनगर,गुजरात, दिल्ली येथील कंपन्या शेतातूनच माल खरेदी करून घेऊन जातात. तसेच त्यामध्ये आंतरपीक म्हणून सीताफळाची लागवड केली आहे. तसेच त्यांनी हळूहळू करवंदाची रोपवाटिका तयार केली आहे. त्यांनी २० ते २५ रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देतात.
श्री. साधू यांनी त्यांच्या शेतात विहीर घेतली आहे. तसेच त्यांनी शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे; तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून त्यांच्या शेतात शेततळे घेतले आहे.
कृषी विभागाच्या ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ योजनेतून दोन वर्षांपूर्वी श्री. साधू यांनी ठिबक सिंचन संच व मोटार घेतली आहे. त्यांच्या शेतात उपलब्ध असलेल्या विहीर शेततळ्याच्या व माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे ते पिकाला
पाणी देतात. त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळत असल्यामुळे पाण्याचीही बचत होत आहे. श्री. साधू यांना कृषी विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते सांगतात.
श्री. साधू आपल्या शेतात गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करून शेतातील पिकांना देतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही चांगले होते. एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. श्री. साधू त्यांच्याकडे असलेल्या चार गाई, एक वळू, एक म्हैस व एक बैलजोडी यांचे गोमुत्र जमा करून ते पिकांना देतात, असे वेगवेगळे प्रयोग श्री. साधू यांनी त्यांच्या शेतात केले आहेत.
त्यामुळे एक प्रयोगशील शेतकरी म्हणून हिंगोली येथे २५ ते २८ मार्च, २०२३ या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.