red banana सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातील अभिजीत पाटील नावाच्या उच्चशिक्षित तरुणाने शेतीत नवा आदर्श घालून दिला आहे. सिविल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला.
लोकांना असे वाटते की शेतीतून फक्त उदरनिर्वाह करता येतो, परंतु आर्थिक समृद्धी मिळवता येत नाही. मात्र, अभिजीत पाटील यांनी या विचारधारेला पूर्णपणे खोटं ठरवलं आहे. त्यांनी आपल्या चार एकराच्या शेतात लाल केळीची लागवड करून 35 लाख रुपयांची कमाई केली आहे.
अभिजीत पाटील यांनी सांगितले की, लाल केळीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि त्यामुळेच डॉक्टर देखील या केळीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. विशेष म्हणजे, या केळीला बाजारात मोठी मागणी असून त्याला चांगला भाव मिळतो.
मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे लाल केळीला बाजारात अधिक दर मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. चार एकराच्या शेतातून त्यांनी 60 टन लाल केळीचे उत्पादन घेतले आहे, ज्याची विक्री करून त्यांना 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मेट्रो शहरांमध्ये लाल केळीला उच्च व श्रीमंत वर्गात मोठी मागणी आहे, असे पाटील सांगतात. तसेच, मोठ्या हॉटेलमध्ये देखील या केळीला चांगली मागणी आहे.
लाल केळीच्या शेतीचा हा यशस्वी प्रयोग पाहून पाटील यांनी आता आणखी एक एकर जमिनीवर याची लागवड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.