लाडकी बहीण योजना बंद होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ठाम उत्तर, म्हणाले ‘अनेक योजना..
ladki bahin yojana :लाडकी बहीण योजना बंद होणार का, या प्रश्नाला उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की, विरोधक कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिलो आहोत हे त्यांना सहन होत नाही.
कोल्हापुरात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान सोहळ्याच्या वेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. “आमच्या मुली सुरक्षित नाहीत असं सांगून विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मुलींना सुरक्षित ठेवू आणि ही योजना सुरूच ठेवू,” असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. विरोधक कारणं शोधत आहेत, पण त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.
फडणवीस यांनी विरोधकांच्या पूर्वीच्या सरकारवरही टीका केली, जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा स्थगिती दिली जायची, पण आमच्या सरकारने या योजनेला गती दिली आहे. ते म्हणाले, “नव्या सरकारमधील योजना बंद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत आणि या योजनेसह इतर अनेक योजना उत्तम प्रकारे मांडू.”
राजकीय टीकेबरोबरच, फडणवीस यांनी महिला सुरक्षेवरही जोर दिला. “आम्ही ठरवलं आहे की अशा घटनांतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे सहन करणार नाही. मुलगी कोणतीही असली तरी ती आपलीच आहे,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलं की, विरोधकांनी कशाप्रकारे अतिशय गंभीर घटनांकडे दुर्लक्ष केलं आहे आणि राजकारण करण्याऐवजी समाजातील कीड संपवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, “त्यांनी राजकारण करावं, पण आम्ही समाजातील वाईट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी ठाम आहोत. 2021 आणि 2022 साली घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की 2023 मध्ये अशा घटनांमध्ये घट झाली आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं.